बकरीच्या बदल्यात धान्य हा हिशेब जमेना तेव्हा
2600 वर्षांपूर्वी माणसाने कवड्या, शिंपले जमवले,
दगड शोधले, धातूची नाणी पाडली, नोटा छापल्या
आणि आता तर पैसा म्हणजे नुस्ते स्क्रीनवरचे आकडे!
कवड्यांपासून क्रिप्टो करन्सीपर्यंतच्या
पैशाच्या प्रवासाची अदभूत कहाणी
-गौरव सोमवंशी
आपण खिशातल्या पाकिटातून नोटा काढून
खर्च करतो आणि क्यू आर कोड स्कॅन करून
फक्त आकड्यांनी 'पेमेंट' करतो, तेव्हा
पैशाबरोबरचे आपले वर्तन नेमके कसे बदलते?
नोटांचा स्पर्श विसरत चालल्याची
शिक्षा नेमकी काय असू शकते?
-विश्राम ढोले
खिशात पाचशेच रुपये असले, तरी
तरुण मुले सिनेमाच्या तिकिटावर
तीन-साडेतीनशे का उडवतात?
वरून शंभरची कॉफी कशी पितात?
जेन झी मुलामुलींना खरोखरच पैशाची
काही किंमत नसते का?
- राही श्रुती गणेश
बिल गेट्स असो नाहीतर मार्क झकरबर्ग,
पश्चिमेकडील धनाढ्य अब्जावधी डॉलर्सच्या
साम्राज्यातला बहुतांश पैसा समाजाला देतात,
भारतासह पूर्वेकडील देशांत मात्र संपत्ती
मुलाबाळांकडेच सरकत राहाते...हे कसे?
पूर्व आणि पश्चिमेकडच्या पैसे कमावण्याची
आणि खर्च करण्याची तुलना
- रवी टाले
सरकारकडून दरमहा पैसे येतात,
त्याचे या बायका काय करतात?
त्या हक्काच्या पैशामुळे काय बदलते?
त्यांचे राजकीय मत? घरातले स्थान?
की संसारातला मान?
सरकारी भाऊबीज मिळणाऱ्या 'लाडक्या बहिणीं'च्या घरी जाऊन
शोधून आणलेली काही रहस्ये...
- मेघना ढोके
महानगराच्या गजबजलेल्या चौकातला भिकारी
दिवसाला ८०० ते १००० रुपयांपर्यंत
कमाई सहज करतो. कुंभमेळ्यात
एका भिकाऱ्याची महिन्याची कमाई
लाखभर रुपयांपेक्षा जास्त होते,
यावर तुमचा विश्वास बसेल?
मुंबईतल्या भिकाऱ्यांच्या जगात घुसून शोधलेली
दारिद्र्य, करुणा, शोषण, संघर्ष... आणि श्रीमंतीची कहाणी
- रवींद्र राऊळ
पैसा नावाची गोष्ट इथे पोचतच नाही.
तरुण पोरे उडून गेली की उरलेसुरले लोक
भुकेशी झगडत वाघासोबत राहातात.
'विकास' आणि 'प्रगती' ही दोन्ही भावंडे
गेल्या पंच्याहत्तर वर्षांत इथे पोचलेलीच नाहीत!
भारतातल्या सर्वात गरीब जिल्ह्यातल्या सर्वात गरीब गावातून
थेट नेपाळपर्यंत पायपीट करून शोधलेली चित्तरकथा
- समीर मराठे
रस्त्यासाठी जमीन गेली, आणि वर्षाकाठी
जेमतेम दोन-तीन लाखाची जुळवणाऱ्या कुटुंबात
अचानक दोन-तीन कोटी रुपये आले.
पुढे काय झाले?
माणसांच्या नाकातोंडात अफाट पैशाच्या पुराचे पाणी शिरल्यावर काय होते?
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या गावांमधून स्पेशल रिपोर्ट
- श्रीनिवास नागे, प्रसाद आर्वीकर
एका विशिष्ट टप्प्यावर पैसा कमावणे थांबवून,
खर्चाला लगाम घालून नवे सुख्
शोधणारे लोक या जगात आहेत.
त्यांना हे कसे जमते?
पैशावाचून असे कितीसे अडते, हे शोधण्याच्या धडपडीची
आणि असे प्रयोग करणाऱ्या माणसांची गोष्ट
- वंदना अत्रे
३ महिने फिरायचे म्हणून बाहेर पडलो, ते
थेट ३ वर्षांनंतर ५ खंड आणि ३५ देश फिरूनच
घरी परतलो. पैशाविना काही अडले नाही!
खिशात फक्त ६२,००० रुपये घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करताना
देशोदेशीच्या अनोळखी माणसांनी मला सांभाळले, जगवले,
पैशाशिवायचे कित्येक मार्ग सापडत गेले, त्याची कहाणी!
- विष्णुदास चापके
२००८ साली मी ठरवले, पुढले वर्षभर
पैसा न वापरता जगून पाहू! – सोपे नव्हतेच!
शिकत, शोधत गेलो... तसे पर्याय सापडले.
- पुढे मी तीन वर्षं पैशाशिवाय मजेत जगलो.
त्याची कहाणी!
पैसे न वापरता जगण्याचा प्रयोग करताना सापडलेल्या रहस्यांचा शोध
- मार्क बॉयल
कुटुंबातल्या नात्यांना पैसा सुरक्षेची ऊब देतो,
की अती हव्यास आणि महत्त्वाकांक्षांच्या सुरीने
आनंदाचे, सुखा-समाधानाचे तुकडे पाडतो?
भारतीय मध्यमवर्गाच्या घरात शिरलेल्या पैशाने
कुटुंबातल्या नातेसंबंधांचे नेमके काय केले?
- शिरीषा साठे
राज कपूरच्या काळात सिनेमातले श्रीमंत लोक दुष्ट(च) असत.
मग 'फेकलेले पैसे उचलत नाही जा' म्हणणारा
अँग्री यंग मॅन आला आणि आता बॉलिवुडकरता
हजार पाचशे कोटी म्हणजे चिल्लर खुर्दा!
पैसे असणे आणि नसणे या कहाणीशी बॉलिवुडचा 'रिश्ता' कसा बदलत गेला?
-मेघना भुस्कुटे
एखादा माणूस लाखो डॉलर्स देऊन चित्र विकत घेतो
तेव्हा तो नेमके काय विकत घेत असतो?
कॅनव्हास? रंग? फ्रेम?... की त्या चित्रामागची कथा?
आज ज्यांचे कॅनव्हास लाखो डॉलर्सना विकले जातात,
ते बहुतेक महान कलावंत गरिबीत का मेले?
- शर्मिला फडके
व्यवहार उत्तम कळणारा मी,
ठरवून बिनव्यवहारी राहिलो आहे.
पैशाचे मोल कळूनही मी माझे जगणे
त्याभोवती व्यापू दिलेले नाही.
'पैशा'कडे पाठ फिरवून ज्यात जीव रमतो तेच करत राहिले, तर
Money सोबत Meaning ही मिळवता येते. कसे? - त्याचे रहस्य!
- अतुल पेठे
संपत्तीसाठी सत्ता हवी, सत्तेसाठी राजकारण हवे,
राजकारणासाठी पैसा हवा; मग सत्तेतून पैसा आणि
पैशातून पुन्हा सत्ता... या गोंधळात
पैशाने लोकशाहीच विकत घेतली आहे का?
राजकारणात पैसा कुठून येतो, कशासाठी कुठे खर्च होतो आणि
त्याच्या बदल्यात कुणाला काय अपेक्षित असते?
- सुहास पळशीकर
सरकारी कार्यालयात नियमानुसार
काम करण्याचे पैसे लागतात का?
अधिकारी बिनापैशाचे काम करतात का?
पैसे न घेता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना
मिळणाऱ्या पगारात भागवता येते का?
पगारात बिलकुल भेसळ खपवून न घेणाऱ्या अधिकाऱ्याचे
प्रामाणिक आत्मकथन
- तुकाराम मुंढे
बिझनेस क्लासचे तिकीट परवडणारे भारतीय लोक
एअरपोर्टवर रांगा का तोडतात?
महागड्या गाड्या चालवणारे रस्त्यावर
राडा का घालतात?
भारतात श्रीमंती वेगाने आली, पण शहाणपण, सूज्ञता का आली नाही?
श्रीमंत होता होता आपण मग्रूर आणि उध्दट का होत गेलो?
- डॉ. शशी थरूर
हजारो कोटींची कमाई, खासगी विमाने,
डेस्टिनेशन वेडिंग्ज, अखंड सेलिब्रेशन
...सगळ्याची नुस्ती लयलूट आहे.
भारतातल्या नवश्रीमंतांनी या देशात
नक्की काय बदलले?
हाय नेटवर्थ इंडियन्स - भारतातले हे ब्रॅण्ड न्यू सुपर रिच लोक
आतून अस्वस्थ का असतात? कशाने?
- शोभा डे
घाटकोपरला म्हाडाच्या घरात राहाणारा मुलगा
शाळेच्या कँटीनमध्ये चहा-समोसे खाता यावेत
म्हणून वडिलांकडून थोडे पैसे उधार घेऊन
स्टेशनरी विकायला सुरुवात करतो.
आणि पुढल्या चाळीस वर्षांत
दोन बिलियन डॉलर्सचे साम्राज्य उभे करतो...
या दोन टोकात काय काय घडते?
दुबईतील ख्यातनाम उद्योगपती रिझवान साजन यांची कहाणी
त्यांच्याच शब्दात!
पैसा
तो किती मिळाला म्हणजे पुरेसा असतो?
बिल गेट्स, मार्क झकरबर्ग, इलॉन मस्क
वॉरन बफे, गौतम अदानी, मुकेश अंबानी
आणि शाहरुख खान
विप्रो या कंपनीसाठी मी अफाट कष्ट केले .
पण संपत्तीचा संचय जमू लागला,
तसे मला प्रश्न पडत गेले.
जे मिळाले ते खरेच माझे एकट्याचे आहे का?
कसे असेल?
पैसे मिळवण्याच्या प्रक्रियेपेक्षा तो समाजाला परत देण्याच्या कृतीने
मला अपार आनंद मिळवून दिला आहे. का, ते सांगतो!
- अझीम प्रेमजी
सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क म्हणतात
यंत्रं पुरेशा वस्तू आणि सेवा निर्माण करू लागतील,
तेव्हा काम करणं ऐच्छिक असेल आणि
पैसा अप्रासंगिक!
मुबलकतेच्या या ‘रामराज्या’त खरंच पैसा संपेल?
‘चांगलं जीवन जगण्यासाठी किती उत्पन्न आवश्यक आहे’
याचं गणित पूर्णपणे बदलेल, तेव्हा काय होईल?
-चिन्मय गवाणकर
मला आयएसएस ऑफिसर व्हायचं होतं.
मी युपीएससीची तयारी करत होतो.
अचानक खुद्द अमिताभ बच्चन यांच्यासमोरच्या
हाॅट सीटवर बसून मी एक कोटी रुपये कमावले,
आणि माझं जगच बदलून गेलं.
... एका क्षणात मी रॉक स्टार होऊन गेलो.
पैसे आले. माझी स्वप्नं बदलली.
पायाखालचे रस्तेही बदलत गेले.
'कौन बनेगा करोडपती'मध्ये सर्वात प्रथम एक कोटी रुपये जिंकल्यानंतरच्या 26
वर्षात पुढे काय काय झालं?
-हर्षवर्धन नवाथे
