एरवी समाजातला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे मान्यवर
जेव्हा स्वतःला त्रास देणारे, अस्वस्थ करणारे प्रश्न AI Chatbots ना विचारतात, तेव्हा काय होते?
- एक विलक्षण संवाद
डॉ. अभिजित बॅनर्जी, डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. अभय बंग,
राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस आणि शशी थरूर
शाहरुख खान, दीपिका पादुकोण, शोभा डे आणि जावेद अख्तर,
डॉ. तारा भवाळकर, कुमार केतकर, प्रल्हाद वामनराव पै आणि अतुल पेठे
या प्रत्येकाला त्रास देणारा, अस्वस्थ करणारा 'तो एक प्रश्न' कोणता आहे?
'आर्टिफिशियली इंटेलिजंट' असलेले चॅटबॉटस त्या प्रश्नाचे उत्तर काय देतील ?
पॅरिस.
या रंगीन शहराच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये लपलेले अनेक बार.
आधुनिक चित्रकला इथे जन्मली... वादविवाद घडले, भांडणे रंगली...
कित्येक दशकांची परंपरा असलेल्या एका रंगीन दुनियेची थक्क करणारी सैर
युरोपातल्या अनेक शहरांमधले बार ही केवल मद्यालये नाहीत.
तिथे खूप काही घडून गेले आहे.
चित्र-शिल्पकलेच्या इतिहासाला इथल्या नशेने वळण लावले, दिशा दिली...
असे काय घडले या मद्यालयांमध्ये? ते का इतके महत्वाचे आहे?
-सुभाष अवचट
धिंगाणा कर्कश तेवढीच इथली एकाकी शांतता मुकी,
शरीराची मस्ती फुरफुरणार तेवढीच एकेकट्या जीवांची धुम्मस तगमगणार.
कितीही बदनाम असोत या गल्ल्या, अनेकांचे पाय इकडे वळणारच!
-मुंबईच्या नाईटलाइफचे नखरे अनंत. त्यात बार आणि त्यातही डान्सबार, ही कायम चर्चेची गोष्ट.
पण या शहरातल्या बारमध्ये फक्त दारू नसते, तिच्या अवतीभोवतीने विणलेले असंख्य गुंते.
जेवढी बेधुंद नशा तेवढेच पूर्ण अक्कलहुशारीने लावलेले ट्रॅप,
जेवढा झगमगाट, तेवढाच अंधार असणार... फार विचित्र दुनिया आहे ही!
काय आहेत या दुनियेतली रहस्यं ?
- रवींद्र राऊळ
ओल्या रंगांनी भिजलेले ब्रश कॅनव्हासवर जिवंत करतात ते चित्र
आणि स्टायलसच्या टोकाने आयपॅडच्या स्क्रीनवर काढलेले चित्र...
ही वेगवेगळी असते का जादू?
एक चित्रकार जेव्हा 'इकडून' 'तिकडे’ जायचे ठरवतो,
तेव्हा कसा होतो त्याचा प्रवास?
ओल्या रंगात बुडवलेल्या ब्रशमधून येणाऱ्या ओघळाने रंगलेली बोटं फडक्याच्या बोळ्याला
पुसून पुढल्या क्षणी आयपॅड उघडतो मी. तिथल्या आभासी रंगांच्या दुनियेतही बोटं तशीच
बुडतात माझी. भिजतातही.
ट्युबा पिळून कालवलेले रंग खरे आणि आयपॅडच्या सिंथेटिक गुहेत चमकणारे रंग
डिजिटल म्हणून ते खोटे, असलं काही नाही वाटत मला.
फक्त चित्रकलेची केमिकल्स वहायला लागतात मेंदूतून शरीरभर.
सगळ्यात सगळा अर्थ आहे आणि कशालाच कसला अर्थ नाही.
मानण्यावर असतं सगळं. मेंदूत असतं.
-चंद्रमोहन कुलकर्णी
गेली सुमारे दीड हजार वर्षं जगाला वेड लावणाऱ्या कन्नौजी अत्तरांच्या
घमघमत्या दुनियेतून केलेल्या धुंद भटकंतीची गोष्ट.
कन्नौज.
एका रणरणत्या परफ्यूमरीत मी उभी आहे.
आजूबाजूला माणूसभर उंचीच्या फुलांच्या पाकळ्यांच्या राशी हारीने रचलेल्या.
मधोमध अर्धा भाग मातीने लिंपलेल्या तांब्याच्या अजस्र रांजणांच्या रांगा,
त्यांचा अर्धा उघडा धातूचा भाग तापून लाल रसरशीत झाला आहे.
त्या उकळत्या रांजणात फुलांच्या नाजूक कोवळ्या पाकळ्यांची पोतीच्या पोती ओतली जातात.
खाली धडाडून पेटलेल्या भट्टया.
हाताच्या स्पर्शानेही कोमेजणाऱ्या नाक फुलांमधलं अत्तर
हे असं धगधगत्या अग्निकुंडातून काढतात?
- शर्मिला फडके
'ब्लॅक मॅजिक'साठी प्रसिध्द असलेल्या या गूढ, रहस्यमयी गावाचा शोध घेत
आसामच्या जंगलात फिरताना काय सापडतं? जादूटोणे, काळी जादू, छा छू उतारे,
टाचण्या टोचलेल्या काळ्या बाहुल्या... की 'माणसं'?
कुणी म्हणतं त्या गावात गेलं तर कुणी तोंड उघडत नाही,
घरोघर काळी जादू करणारी माणसं आहेत.
बाहेरून आलेलं कुणी आवडलं तर त्या व्यक्तीला घोडा गाढव करुन
आपल्यासोबतच कायमचं ठेवून घेतात.
कुणी म्हणतं, कुणावर करणी करायची, केलेली करणी तोडायची तर
त्या गावात एकाहून एक तांत्रिक आहेत.
कुणी म्हणतं, सत्ता हवी, पैसा हवा, ताकद हवी, तर 'तिकडे' जा..
त्या गावात मिळतो तोडगा, नशिबच पालटून जातं!
खरंच असं आहे का?
- मेघना ढोके
मध्ययुगीन युरोपातल्या काळोख्या अंधारवाटांचा शोध घेताना
भेटलेल्या चेटकिणी
आणि सैतानांची कहाणी
चेटूक विद्या, जादूटोणा, मंत्रतंत्र या संशयाखाली पस्तिशी-चाळिशीतल्या
बायकांना जाळून, दगडाने ठेचून मारण्याची क्रूर प्रथा युरोपात हजारो वर्षं होती.
या स्त्रिया चेटक्यांचं रूप घेऊन रात्रीच्या वेळी गुपचूप सैतानाशी संग करतात,
मेंढ्याचं मुंडकं किंवा झाडूवर बसून उडत जातात,
त्यांच्यामुळे गावांवर संकटं येतात, पाणी विषारी होतं, युद्धं ओढवतात,
म्हणून या स्त्रियांना 'चेटकिणी' ठरवून त्यांचा नायनाट केला जाई.
आणि आता?
- आजही जर्मनीच्या काही भागात ठरावीक तारखांना ऐन मध्यरात्री
'चेटकिणींच्या नाचा'चा खेळ रंगतो!
- वैशाली करमरकर
चाकण. महिंद्रा अँड महिंद्राचा अत्याधुनिक 'प्लान्ट'.
इथे इलेक्ट्रिक गाड्या तयार होतात आणि त्यांची जुळणी करतात रोबो. यंत्रमानव.
म्हणजे नेमकं काय होतं? कसं होतं?
एक वेगाने सरकणारी अत्याधुनिक असेम्ब्ली लाईन...
त्यावरून सरकत येणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सचे उघडे सांगाडे...
'असेम्बल' करण्यासाठी भोवती सज्ज उभ्या अजस्त्र यंत्रमानवांचे लांबलचक हात...
ठरल्या वेळी, ठरला भाग ठरल्या ठिकाणी अचूक जोडला जाणार आणि
एक जन्माला येत असलेली गाडी पुढे सरकणार...
कशी घडते ही जादू?
- श्रीनिवास नागे
महाकाय जहाजं तोडून त्यांचा खिळा न् खिळा अलग करणाऱ्या
अलंगच्या शिप ब्रेकिंग यार्डमध्ये नेमकं काय घडतं?
मृत्युपंथाला लागलेलं एक जहाज...पोट चिरलेलं. आतडी फाटून बाहेर आलेली.
शेकडो कामगार घाव घालत होते. ‘चटके’ दिले जात होते. तुकडेतुकडे तोडले जात होते.
त्या जहाजाच्या पोटातला ऐवज काढून घेऊन, त्याचे हात-पाय तोडून उरलंसुरलं शरीर कुरतडायला
शेकडो कामगार उंदरांसारखे चिकटले होते...
शेजारीच लिलाव सुरू होता. लोक जमले होते. बोली लागली होती. गाड्या उभ्या होत्या.
जो जास्त दाम देईल, तो या जहाजाचा एकेक अवयव विकत घेऊन जाईल;
आणि पुढे?
-समीर मराठे
घराघरातल्या कपाटात शिरलेला, महासागरांच्या पोटात घुसलेला, पाणी ढोसणारा,
प्लास्टिक ओकणारा, कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर रचणारा,
अधाशी माणसांच्या मानगुटीवर बसलेला 'फास्ट फॅशन' नावाचा राक्षस
एक टी-शर्ट बनवायला २७०० लिटर पाणी लागतं... जीन्सवर ‘सँडब्लास्टिंग’ करताना
बांगलादेशातल्या कुणाची तरी फुप्फुसं वाळूचे कण, विषारी वायूंनी भरून जातात...
तुम्ही काल ऑनलाईन विकत घेतलेले ट्रेण्डी, स्वस्तातले मस्त कपडे आज वापरून उद्या
कचऱ्यात फेकता, ते जमिनीत गाडले जातात, समुद्रात वाहात जाऊन किनारेच्या किनारे
गुदमरून टाकतात...
ऊठसूट शॉपिंग करायला सोकावलेल्या उतावीळ, अतृप्त लोकांची कपाटं
गच्च भरून ओथंबून शेवटी गळायला लागतात, तरीही त्यांना नवे कपडे विकत घ्यायचेच
असतात!!
- का?
- माधुरी पेठकर , भक्ती बिसुरे
ऑपेराच्या रंगमंचावरल्या लयदार झग्यांच्या हातशिलाईचे,
सुया-दोरे-बटणे आणि मण्यांचे, बूट रंगवण्याचे , बॅकस्टेजच्या दंगलीचे
सुरस आणि चमत्कारिक दिवस
अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यात सॅन्टा फे ऑपेरा कंपनीचे कॉश्च्युम शॉप.
ऑपेरातल्या नाटकांची वेशभूषा जिथे घडते ते ठिकाण. एक विलक्षण जग होते ते.
सुया, दोरे, बटणे, झिप्स, वेल्क्रो, इलॅस्टिक्स, कात्र्या,
शिवणउसवे, मेजर टेप्स, बेतकामाचे छापील पॅटर्न्स आणि कापडे.
ऑपेरा स्टेजवर जायच्या आधीचे सारे नाट्य इथे घडते.
ते घोळदार गाऊन्स इथे जन्माला येतात.दागिने, पर्सेस, पादत्राणे, मुखवटे, चिलखते
हे सारे बनवता बनवता गायकनट, नर्तकांची वर्दळ असते...
दूरवर चाललेल्या ऑपेराच्या प्रॅक्टिसमधले सूर अखंड वाऱ्यावर तरंगत असतात.
संथ लयीची जादू टाचून दिलेल्या या जगातल्या तीन उन्हाळ्यांची गोष्ट
- नीरजा पटवर्धन
आपल्या आयुष्याच्या वातीला वेगाची, अस्थैर्य-असमाधानाची आग लागली आहे,
जळत जळत आपली राख होते आहे, याचे भान आपल्याला आहे का?
सतत धावत-पुढे जात राहण्याचे ओझे, अपडेट असण्याचे-रिलेव्हंट राहण्याचे ओझे मानगुटीवर घेऊन अखंड पळत राहा.
थांबू नका, सतत सतत नवे शिकत राहा, संवाद करत राहा, माहिती शोधत राहा,
नव्याचे नवेपण नऊ दिवसात संपवून दुसरे नवे शोधा, त्याच्यामागे पळत राहा,
'आत्ता आणि इथे' असताना 'नंतर आणि तिथे'ही असा...
टार्गेट कम्प्लीट करा, परफॉर्मन्स अप्रायझल मिळवा, लाईक-शेअर-सबस्क्राईब करा,
हे आपले काय चालले आहे? आणि का?
- विश्राम ढोले
धावत सुटलेल्या बसमधून 'खाली' उतरून शांत, संथ लयीतले साधे आयुष्य
जगायला निघालेल्या माणसांनी एक पर्यायी वाट शोधली आहे : स्लो लिव्हिंग!
-त्या प्रयत्नांची कहाणी
कुण्या एका 'सुखाच्या शोधा'ने आपल्या जगण्यात घाई आणली,वेग आणला, आसक्ती आणली !
सगळ्या धावपळीत महत्त्वाचे काहीतरी आपल्या हातून सुटून् गेले : निवांतपणा.
'आज आणि आत्ता' मन लावून जगण्यातला सुकून.
सहज श्वास घेता घेता संथ लयीत वास घेण्याची,
चवी चाखण्याची, नाती राखण्याची, आयुष्य जगण्याची संधी...
हे गमावले आहे आपण! ते हरवले सुख परत मिळवता येईल का?
जगभरात सुरु असलेल्या एका धडपडीची 'निवांत' गोष्ट
- प्राजक्ता पाडगांवकर
वेगाने वृद्ध होत चाललेल्या भारतातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या जगातली
जुनी दुःखे आणि नव्या सुखांचा शोध
२०५० साली भारत जगातला 'सर्वात म्हातारा देश' असेल. म्हणजे उरली फक्त २५ वर्षे.
त्यात भर म्हणजे आपला देश श्रीमंत होण्याआधीच म्हातारा होणार आहे.
स्वप्नांच्या मागे देशापरदेशात उडून गेलेली मुले,वाढलेले आयुर्मान, एकाकीपणाचे भय,
'वेळ येईल तेव्हा आपली काळजी घेणारे कोण असेल?'
या काळजीने मन कुरतडणारा भुंगा...
ज्येष्ठ नागरिकांना घेरून असलेल्या या सगळ्यावर कुणी काही उत्तरे शोधते आहे का?
तर हो, आणि नाही!
- वंदना अत्रे
अमेरिकेतलं 'ओल्ड एज'
भारतातल्या 'वार्धक्या'पेक्षा वेगळं असतं का?
'असिस्टेड केअर फॅसिलिटी’मध्ये जेवण म्हणूनमिळणारा ‘प्युरीड ट्युना अँड बीन्स’चा कॅन बघून
गरमागरम मऊ खिचडीच्या आठवणीने व्याकुळ होणारी जे,
फोनवर बोलताही येत नाही म्हणून मित्राना टेक्स्ट मेसेजेस पाठवणारी मार्गारेट,
रोज उत्साहाने 'वॉक' घ्यायला बाहेर पडणारा सत्तरी ओलांडलेला उत्साही रे,
“मला तू फार आवडतेस, आपण बाहेर जाऊनएक सिगारेट ओढूया?”- असं कर्स्टनला विचारणारी
असिस्टेड लिव्हिंगमधली हेलन...
किती जणांच्या किती गोष्टी सांगू मी तुम्हाला...
- धनंजय जोशी