भारताच्या राजकारणात ही इतकी दलदल कशी आणि का तयार झाली?
सत्तेच्या मोहाने सगळे मूल्यसंकेत का आणि कसे ओलांडले?
देशउभारणी आणि लोककल्याण हे उद्देश पुसट होत जाऊन राजकीय नेत्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा
अधिक मोठ्या होत जाण्याचा प्रारंभ कधीचा?
'राजकारण घाणेरडे असते, त्याच्याशी आमचा काही संबंधच नाही' अशी पळपुटी भूमिका घेऊन या व्यवस्थेपासून
'तुटलेले' उच्च मध्यमवर्गीय आणि त्याच्या वरच्या स्तरातले लोक एकीकडे..
तर जगण्याचे मूलभूत प्रश्नच गळ्याशी आल्याने आक्रस्ताळ्या मागण्या घेऊन राजकीय नेत्यांची मानगूट धरायला
रस्त्यावर उतरलेले सामान्य लोक दुसरीकडे.
या दोघांच्या कचाट्यात सापडलेल्या राजकीय वास्तवाचा पुढला प्रवास कसा होईल?
- योगेंद्र यादव
जगाचे 'नैतिक नेतृत्व' करू शकतील अशा खुर्च्यांवर आता कुणी महापुरुष उरले नाहीत. तरीही मानवी समाजांची
नैतिक पातळी वाढलीच आहे... असे कसे घडले?
हल्ली भारतीय माणसांमध्ये मणक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कॉक्सीक्स हाडाची फ्रॅक्चर्स फार वाढली
आहेत. हे अचानक का झाले? - तर मोठ्या प्रमाणात वापरात आलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या! रंगीत, स्वस्त;
म्हणून लोकप्रिय अशा या खुर्च्यांचे प्लास्टिकचे चारही पायच मुळात कमजोर! हे पाय अचानक मोडून
त्यावर बसलेला माणूस दाणकन खाली आपटून कॉक्सिक्स हे हाड तुटते. समाजाच्या खुर्चीची सध्याची
स्थिती तशीच आहे. राज्यशक्ती, धनशक्ती, ज्ञानशक्ती आणि जनशक्ती या चार पायांवर उभी असूनही
ही खुर्ची बरेचदा मोडते. कारण?
- डॉ. अभय बंग
दुसऱ्याच्या बुडाखालची खुर्ची बळकावण्याच्या ईर्ष्येपायी डोके फिरलेली माणसे वाट्टेल त्या थराला जातात. हे का
घडते? सत्तेचा मोह माणसाच्या गुणसूत्रातच मिसळलेला आहे का?
सर्वशक्तिमान होण्याच्या नादात आजवरच्या सर्व हुकूमशहा सत्ताधीशांनी त्यांचे स्वतः:चे / त्यांच्या प्रदेशाचे
नुकसानच केलेले आहे हे स्पष्ट असताना आजही ती भूक कायमच आहे. देशाचा प्रमुख असो नाहीतर कुटुंबाचा
प्रमुख, 'सहकार्यापेक्षा सत्ता'च आकर्षून घेते. ती का? ही शर्यत मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यावर कधीतरी संपेल याची
वाट पाहणे हेच मानवाच्या हाती आहे की सामूहिक स्तरावर चाललेल्या / केलेल्या प्रयत्नांना यश येऊ शकेल?
- डॉ. शिरीषा साठे
माणसाची जीवनपद्धती, विचार आणि वर्तनावर पक्की पकड निर्माण करून असलेली धर्माची 'खुर्ची' इतकी
अढळ कशी?
'मेंदू विज्ञान' आणि 'उत्क्रांती विज्ञान' या नव्या ज्ञानशाखा सध्या हे कोडे सोडवत आहेत, त्याबद्दल…
आपल्या शिरावर आपलेच डोके असेल आणि कुणालाही आपल्या भावनांचे अपहरण करू न देता
आपण आपले निर्णय आपल्याच विचार करणाऱ्या मेंदूने घेऊ; हे आपोआप होणारे नाही.
त्यासाठी सजग असावे लागेल. शिकावे आणि शिकवावेही लागेल.
सामान्यांच्या धर्मश्रद्धा ओरबाडून, त्यांच्या मनात घुसून तिथे अमर्याद अधिकारांच्या खुर्च्या
बळकावून बसलेल्यांना त्या स्थानांवरून खाली खेचायची लढाई सोपी नव्हे..
ती लढणाऱ्या मोजक्या विवेकी मनांच्या मदतीला आता मेंदू विज्ञान आले आहे.
- डॉ. हमीद दाभोलकर
नकारात्मक शैथिल्याची भ्रष्ट वाळवी लागून
भुसभुशीत होऊन गेलेल्या नोकरशाहीच्या खुर्चीची गोष्ट
देशाच्या प्रशासन व्यवस्थेतल्या सर्वशक्तिमान खुर्च्यांनी आजवर फक्त मूग गिळले,राजकीय व्यवस्थेशी सतत
'जमवून घेत' राहण्याच्या अप्पलपोट्या स्वार्थापोटी स्वत:च्याच पायावर धोंडा पाडला!
बुडाखालची खुर्ची वाचविणे, आणखी जास्त फायद्याची खुर्ची मिळविणे,
निवृत्तीनंतर पुन्हा नवी खुर्ची मिळावी यासाठी खुर्चीला फक्त 'चिकटून बसणे' एवढेच या खुर्चीने केले!
- महेश झगडे
आता सायेबच 'खुर्ची'करता पक्ष फोडणार किंवा सोडणार, तर मग 'सायबाचा कार्यकर्ता' सतरंज्या का उचलील?
- राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या दुनियेत आणि डोस्क्यात चाललेल्या कल्लोळाची कथा
विचारांवरची निष्ठा, पक्षावरचं प्रेम, नेत्यावरचा विश्वास हे विकले गेले केव्हाच.आजचा कार्यकर्ता फुकटच्या
'कार्या'साठी नव्हे, 'खुर्ची'साठी इच्छुक असतो, खिशातले पैसे घालून बॅनरबाजी करून घेतो,खालची सुमार पदं
मिळवत वरवर चढत पक्षाच्या-नेत्याच्या यंत्रणेत घुसतो.
एकदा का 'भाव' वधारला की आर्थिक लाभासाठी त्याची धडपड सुरू होते.
यंत्रणेच्या बजबजपुरीत तो इतका बदलतो की थेट कार्यकर्त्याचा ठेकेदार कधी होतो,हे त्याचे त्यालाच कळत नाही.
- श्रीनिवास नागे
माणसांच्या आयुष्यात ती 'कधी', 'कुठून' आणि 'कशी' आली? माणसा-माणसांमध्ये खुन्नस आणि ईर्ष्या पेरून
रक्ताचे पाट वाहायला लावणाऱ्या एका 'वस्तू'च्या जन्माची कहाणी.
घरात असा, ऑफिसात असा, कामाला बाहेर जा, नाटक-सिनेमा पाहायला थिएटरमध्ये जा, हॉटेलमध्ये जा,
मित्रांशी गप्पा छाटायला नेहमीच्या कट्ट्यावर जा; बूड टेकवायला आधार म्हणून ती असतेच. पण आपल्या लक्षात
येत नाही; कारण आपण तिच्याकडे कधी नीट 'बघत'च नाही.
तिचा आकार आपल्याला 'दिसत' नाही. तो असा का असेल, कसा-कुणी शोधला असेल,
कशा-कशातून तयार झाला असेल, याचा साधा विचारही आपण करत नाही.
कारण 'ती' असतेच ना!!
पण माणसांच्या आयुष्यात ती 'कधी', 'कुठून' आणि 'कशी' आली?
- हृषीकेश खेडकर, स्नेहल जोशी
एका जगप्रसिद्ध चित्रकाराने स्वत:च्या हाताने लाकूड तासून दोन खुर्च्या बनवल्या, आणि नंतर रंगवल्या देखील!
कलेच्या जगात गेली सव्वाशे वर्षे चर्चेचा विषय ठरलेल्या व्हॅन गॉघच्या दोन खुर्च्यांची गोष्ट.
व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ ३५ वर्षांचा, पॉल गोगँ ४० वर्षांचा. अस्वस्थ मनोवृत्तीचा, अशक्त कुडीचा व्हिन्सेन्ट
आणि कणखर स्वभावाचा, बलदंड गोगँ; फ्रान्सच्या दक्षिणेला मेडिटेरियनच्या किनाऱ्यावर असलेल्या आर्ल्स
या लहानशा गावात हे दोघे अडीच महिने एकत्र राहिले.
व्हॅन गॉघने स्वतः रंगवलेल्या 'यलो हाऊस'मधल्या एका खोलीत परस्पर-संवादाच्या ओढीतून सुरू झालेले हे
सहजीवन प्रत्यक्षात रक्त काढणाऱ्या धुमसत्या युद्धाचं कारण बनले!
त्या अस्वस्थ काळात व्हॅन गॉघने स्वतः: बनवलेल्या दोन लाकडी खुर्च्या कलेच्या इतिहासात अजरामर
आहेत. असे काय आहे या दोन ओबडधोबड, सामान्य खुर्च्यांमध्ये?
- शर्मिला फडके
संघर्ष नको पण सत्ताही गमवायची नाही, अशी दुहेरी कसरत साधायची वेळ येते तेव्हा?
- प्राणी युक्त्या वापरून बघतात; टोळ्या फोडतात, शत्रूला तात्पुरता 'मित्र' बनवून 'युती'ही करतात!
माणसाप्रमाणे प्राणीही कळपाने राहातात, वाटून घेतात, मन मारून तडजोडी करतात
पण त्यांच्या सत्तास्थानाला हादरे बसले, की जीव खाऊन चवताळून उठतात.
हातघाईला उतरून स्पर्धकाला चारीमुंड्या चीत करणे,
शरीरसंबंधाला नकार देणाऱ्या मादीला चावणे, बोचकारणे
असल्या खेळात लागणारे कावेबाज क्रौर्य, मतलबी धूर्तपणा, खुन्नस, डाव रचणे
हे सगळे-सगळे त्यांच्या(ही) जगाचा एक भाग आहे!
- वंदना अत्रे
जोडीदाराच्या शरीराला सुख देण्याचा आणि स्वत:च्या शरीरासाठी सुख मिळवण्याचा प्रवास हा फक्त अवयवांशीच
नव्हे, तर दोन मनांशीही जोडलेला असतो; हे उमगेनासं झाले, की गणिते बिघडतात आणि पलंगावर खुर्ची येते.
दुसऱ्याला ओरबाडून आपल्याला हवं ते मिळवण्याचीचटक, दुसऱ्याच्या शरीरावर आपल्या हक्काचे व्रण उमटवून
रक्त काढणारा स्वार्थ,
हवे ते मिळेनासे झाल्यावरचा अतिरेकी संताप किंवा मग हतबल होऊन तडफडत राहाणारे उपाशी शरीर.
या असल्या लढाया पलंगावर सुरू झाल्या की जोडी फुटते.
शरीरांवरच्या सत्तेच्या या खेळाचे सामने, त्यातले छुपे डाव-प्रतिडाव, हल्ले-प्रतिकार आणि खुन्नस मी रोज पाहाते...
मला काय दिसते?
- डॉ. सबीहा
माणसाच्या शरीरावरचा त्याचा स्वत:चा हक्क बळकावून
ते शरीर दुरुस्त करण्याच्या, जिवंत ठेवण्याच्या 'व्यवसाया'तल्या
गुंतागुंतीच्या संघर्षाची कथा
तुमची गुणसूत्र रचना, आजवरचे आजार, तुमची जीवन पद्धती, कामाचे स्वरूप,
व्यसने,रोजचा प्रवास, डिजिटल संभाषणांमधून कळणारा तुमचा स्वभाव
या सगळ्या माहितीचा वापर करून तुमची जिवंत राहण्याची शक्यत
तपासणे हे 'एआय' चुटकीसरशी करेल.
ही माहिती समजा लगेचच तुम्हाला सांगितली, तर तुम्हाला ती झेपेल?
'पुढच्या दहा वर्षांत अमुक अमुक कर्करोग होण्याची आणि त्याने
तुम्ही मरण्याची शक्यता ४०% आहे' अशी माहिती समजा
एआयने तुम्हाला आजच दिली, तर तुमचे काय होईल?
औषध निर्मात्या, आयुर्विमा-आरोग्य विमा कंपन्या ही माहिती
आनंदाने विकत घेतील आणि तुमच्या आजाराचे निदान, औषधयोजना
हे सगळे करायला डॉक्टर नावाच्या जिवंत माणसाची गरज
कदाचित संपलेलीच असेल.
मग?
- डॉ. भूषण शुक्ल
एकीकडे मी आणि माझी व्हीलचेअर यांना वेगळे-वेगळे अस्तित्व आहे, तर एकीकडे अभिन्नत्व आहे.
तिच्यावाचून माझा देह स्वप्नात आला तर मी कावरीबावरी होते! ती इतकी माझ्याशी जुळलेली आहे की
वाटते, तिचा स्पर्श गरम आहे, माझ्या अंगाइतका..
मी सुटी होऊन दुसरीकडे बसले तर माझा देहगंध तिला येतो. कधीकधी एका अपार निर्मळ क्षणी जाणवते,
माझ्या रक्तवाहिन्याही सुटतफुटत तिच्यात पसरत गेल्या आहेत… त्यातून उष्ण, लाल रक्त वाहते आहे...
ऊर्जा वाहते आहे... चैतन्य पसरते आहे...
- सोनाली नवांगूळ
मुंबई लोकलच्या 'लेडीज स्पेशल' डब्यात एका 'खुर्ची'साठी रोज उसळणाऱ्या थरारक युद्धाची कहाणी
घरीदारी नशिबी असलेल्या तणावाने, अखंड कामाच्या थकव्याने शिणलेल्या, चिडलेल्या, रडीला आलेल्या बायका
अडथळ्यांची शर्यत पार करून लोकलच्या डब्यात मुसंडी मारतात तेव्हा मात्र अत्यंत आक्रमक होतात.
दुसरीला ढकलून, उठवून त्यांना एक हक्काचे अढळपद हवे असते.
लोकलमधली सीट. बसायला जागा!
लोकलच्या डब्यात घुसल्याक्षणी सीटसाठी भुकेल्या बायका तोंड उघडून एका अतिशय क्रूर युद्धाला भिडतात.
डब्यात शिरताच बसलेल्या अनोळखी महिलांना विचारणे सुरू होते, 'किधर है, किधर है?'
कुणी झोपलेली असेल तर तिला गदागदा हलवून उठवून विचारायचे, 'किधर है?'
म्हणजे तू कुठवर जाणार आहेस?
ती जर पुढच्या एकदोन स्टेशनवर उतरणार असेल तर तिला सांगायचे चटकन,
मेरे को देना... जिने मागितली, तिलाच सीट मिळते. नाहीतर चुपचाप शेवटपर्यंत उभ्यानेच प्रवास.
- मेघना ढोके आणि मृण्मयी रानडे
पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच्या धाकधूकवाल्या आणि धपापत्या रोमान्सचा
आधार असलेल्या दोन खुर्च्यांच्या इष्काची गोष्ट.
प्रेमी युगुलांना योग्य प्रमाणात अंधारा एकांत देण्याची सोय म्हणजे कॉर्नर सीट.
ती निवडताना फार गोष्टींचा अभ्यास करायला लागायचा!
अंधार पुरेसा आहे का? डोअरकीपर पडद्याच्या आड उभा राहून आपल्याला निरखत तर नाही ना?
सगळा कारभार चोरटा, कायम घारीची नजर हवी…
पण, प्रेमाची एकेक पायरी पार करत जाण्याची एक खुमारी होतीच.
तासातासाच्या हिशोबात पैसे चार्ज करणाऱ्या चादरबदलू रिसॉर्टवर होणाऱ्या 'संपूर्ण ओळखी'च्या तुलनेत अधिक रोमँटिक…
आणि प्रेमातले टप्पे पार करायला विश्वासाचे पण आणखी काही टप्पे पार करायला लागणार, हे सांगणारीही होती…
- मुकेश माचकर
लेका, पकडून ठेवायला सीट बेल्ट असला, तरी मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक!
- तेव्हा, 'त्या' खुर्चीवर बसून माज करू नये, हे बरं!
सर्व नियंत्रण आपल्याकडे असणं, दिशा, वेग ठरवण्याची ताकद आपल्याकडे असणं आणि (गाडीत बसलेल्या )
इतरांनी आपल्यावर अवलंबून असणं; म्हणजेच 'सत्ता' आपल्या हातात असणं! अशी सत्ता
बहाल करणारी 'ही' खुर्ची म्हणूनच गाडी चालवणाऱ्याला इतकं थ्रिल देत असेल का?
- योगेश गायकवाड
'खुर्ची सेक्स' आणि रोजच्या आयुष्यातल्या बऱ्या-वाईट खुर्च्यांचे काही तुकडे.
बाईला खुर्ची मिळणं आणि तिने त्यावरून मत मांडणं,
बाईने बसल्या जागेवरून एखाद्या पुरुषाला
अमुकतमुक कर - नको करूस असं सांगणं
ह्यानं अनेकांचा अहंकार दुखावतो.
त्या रात्री दिसलाच होता तो राग त्या फुल्याफुल्याफुल्याच्या नजरेत!
- रेणुका खोत
'भाडोत्री सैनिक' म्हणून रशियाने जाळ्यात ओढलेल्या भारतीय तरुणांच्या आयुष्याची दास्तान :
पंजाबच्या गावागावात फिरून शोधलेल्या कहाण्या
'रशियात भारी जॉब आहे. दोन लाख पगार मिळेल' या आमिषाला बळी पडलेले शेकडो भारतीय तरुण अलगद
एजंटांच्या सापळ्यात अडकतात आणि घरचे दागिने-जमीन-शेती विकून पैसे गोळा करतात.
ते पैसे एजंटांच्या घशात घातले की टुरिस्ट व्हिसा घेऊन सीमा ओलांडता येते…
पुढे काय होतं?
रशियन भाषेत लिहिलेल्या एका अगम्य कागदावर सही आणि रवानगी थेट ट्रेनिंग कॅम्पमध्ये.
ट्रेनिंग कसलं? - शस्त्रं चालवण्याचं!
हे तरुण जबरदस्तीने ढकलले जातात ते थेट रशिया-युक्रेन युद्धाच्या आगडोंबात!
पुरेशा प्रशिक्षणाविना अवजड शस्त्रं चालवण्याची सक्ती, आजूबाजूला न पेलवणारा कल्लोळ,
जळलेले-सडलेले मृतदेह, वरून अन्नपाण्याचे हाल आणि घरच्यांशी बोलायला बंदी!
पुढे काय होतं?
- रवींद्र राऊळ
शेतकऱ्याची पोरगी काय म्हंती, शेतकरी नवरा नाई म्हंती :
महाराष्ट्रभर फिरून शोधलेली हतबल आक्रोशाची कहाणी.
महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावखेड्यात जा,
'वय उलटून गेलेली बिनलग्नाची पोरं' हीच एक नवी, ठळक जात गावागावात निर्माण झालीय.
पडलेले खांदे, डोळ्याला डोळा न भिडवणारी संकोचलेली नजर, कुजबुजल्यासारखं खाली मान घालून बोलणं!
ही पोरं गावात वाट चुकवत, नजरा हुकवत चालतात. कुणाच्या लग्ना-कार्यात जात नाहीत.
लोक टोचून बोलतील, गंमत करतील म्हणून जगाला टाळत जगतात.
अनलिमिटेड डाटा आणि खायला उठलेला अनलिमिटेड दिवस जाळत टोळक्याटोळक्यांनी गावात हिंडतात.
डोईवरचे केस गेले तरी बिनलग्नाचे राहिलेल्या या मुलग्यांना 'टग्या' आणि 'वळू' ही दोन विशेषणं लावतात हल्ली!
- शर्मिष्ठा भोसले