मुंबई लोकलच्या 'लेडीज स्पेशल' डब्यात एका 'खुर्ची'साठी रोज उसळणाऱ्या थरारक युद्धाची कहाणी
घरीदारी नशिबी असलेल्या तणावाने, अखंड कामाच्या थकव्याने शिणलेल्या, चिडलेल्या, रडीला आलेल्या बायका
अडथळ्यांची शर्यत पार करून लोकलच्या डब्यात मुसंडी मारतात तेव्हा मात्र अत्यंत आक्रमक होतात.
दुसरीला ढकलून, उठवून त्यांना एक हक्काचे अढळपद हवे असते.
लोकलमधली सीट. बसायला जागा!
लोकलच्या डब्यात घुसल्याक्षणी सीटसाठी भुकेल्या बायका तोंड उघडून एका अतिशय क्रूर युद्धाला भिडतात.
डब्यात शिरताच बसलेल्या अनोळखी महिलांना विचारणे सुरू होते, 'किधर है, किधर है?'
कुणी झोपलेली असेल तर तिला गदागदा हलवून उठवून विचारायचे, 'किधर है?'
म्हणजे तू कुठवर जाणार आहेस?
ती जर पुढच्या एकदोन स्टेशनवर उतरणार असेल तर तिला सांगायचे चटकन,
मेरे को देना... जिने मागितली, तिलाच सीट मिळते. नाहीतर चुपचाप शेवटपर्यंत उभ्यानेच प्रवास.
- मेघना ढोके आणि मृण्मयी रानडे