गेल्या दोन वर्षांतली भीती पुसून टाकण्याची हिंमत देणाऱ्या पाच कहाण्या
2020 वाईट होतं.
2021 बद्दलही अजून खात्री अशी नाहीच.फार ओरबाडून नेलं या वर्षांनी!
अजूनही भीतीचं जनावर आहेच मनात लपलेलं!..
पण कापून वाळत घातला तरी माणूस मरत नाही,
त्याची जात हरत नाही हेच खरं!!
माणसाने महायुध्दं पचवली, दुष्काळ काढले, वणवण सोसली, त्याच्या गावा-देशातून हाकलून लावलं गेलं माणसाला, तरीही तो टिकला..उरला.. उभा राहिलाच!!
गेल्या हजार-पाचशे वर्षांतल्या इतिहासाच्या खिडक्या उघडल्या तर काय दिसतं?- हेच, की कोरोना तुलनेने बरा वागला!!
माणसाने याहून फार फार भयंकर असं काही पाहिलं आहे,
सोसलं आहे!! - आणि तरीही तो उरला आहे,
अधिक खंबीर होऊन लढला आहे!
महाभारतातल्या युध्दाच्या विराट जबड्यात सारं काही ओढलं गेलं... जीवन आणि गर्भस्थ जीवही! तरीही महाभारताची कहाणी संपते, तेव्हा एक शांतता मनाला व्यापून राहाते! -त्या शांततेचं रहस्य आपल्याला बळ देतं... अगदी आजही! - ते काय आहे?
...सरल्यावर जे उरते!
युध्द संपलं आहे.
श्रीकृष्ण गांधारीला रणभूमीवर घेऊन आला आहे.
समोर प्रेतांचा खच. कुणाचे हात-पाय, कुणाचं मस्तक तुटून पडलं आहे,
हत्ती-घोडे मरून पडलेले. रथ मोडून पडलेले.
प्रियजनांना शोधणाऱ्या केविलवाण्या माणसांचे आक्रोश गांधारी ऐकते आहे.
तो मरणाचा ढिगारा उपसताना कुणाच्या तरी हातून हत्तीच्या गळ्यातली एक तुटकी घंटा उलटी होते आणि दिसतं, की त्या घंटेच्या पोकळीत चिमणीएवढ्या पाखरानं आपली अंडी घातली आहेत.
अरुणा ढेरे
"जगभरातल्या युध्दग्रस्त भागात आयुष्याचे जळके तुकडे एकत्र शिवत शिवत टिकून राहिलेल्या माणसांना भेटवणाऱ्या काही खिडक्या हिमतीने उघडताना..."
युध्दं पेटतात. रात्री-बेरात्री टाळक्यावर बॉम्ब पडतात.
गावंच्या गावं बेचिराख, उद्धवस्त होतात.
त्यातली माणसं काय करणार?
आजूबाजूला पेटलेला मरण-कल्लोळ सोसत निमूट जगत राहातात, किंवा मग पोराबाळांना काखोटीला मारून घरदार सोडून बेदखल होऊन जातात. कधी नाहीशीच होतात.
युध्दात मरतात त्यांची नावं ना सही, निदान संख्या तरी जगाला दिसते;
पण युध्दकाळात जिवंत राहातात, त्या माणसांना काय सोसावं लागतं?
निळू दामले
हिटलरच्या छळछावणीत सकारात्मक मानवी ऊर्जेची रहस्यं शोधण्याची जिद्द पूर्णत्वाला नेणारे ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ डॉ. व्हिक्तोर फ्रँकेल यांची सुन्न करणारी कहाणी
से येस टू लाईफ!
डॉ. व्हिक्तोर फ्रँकेल.
सप्टेंबर १९४२ मध्ये हिटलरच्या जर्मन गेस्टापोंनी
एका मध्यरात्री डॉ. फ्रँकेल यांच्या अख्ख्या कुटुंबाला उचलून
किमान साताठ लाख ज्यूंची हाडं संथपणे चघळणाऱ्या ‘आऊसश्वीट्त्स'नावाच्या भयानक छळछावणीत फेकलं.
उपासमार आणि मारहाण सोसत अतिश्रमाने खुरडत, झगडत कसंबसं तग धरून राहिलेलं त्यांचं अर्धमेलं शरीर तब्बल तीन वर्षांनी आऊसश्विट्समधून बाहेर काढलं गेलं, तेव्हा त्यांच्या अंतर्वस्त्रात लपवलेले अनेक कागदाचे कपटे मिळाले.
त्यावर नोंदी होत्या...
माणसाच्या अंतर्मनातली सकारात्मक ऊर्जा जिवंत कशी ठेवता येते, याच्या रहस्याच्या नोंदी!
वैशाली करमरकर
सन 1897 ते 1909 अशी सलग तेरा वर्षे पुण्या-मुंबैतल्या गल्लीबोळात चालतीबोलती माणसं क्षणात आडवी करणाऱ्या प्लेगने धाडी घातल्या, त्या काळाची कहाणी.
सव्वाशे वर्षांपूर्वी पुण्यात गोरा साहेब उंदरांच्या मागे लागला होता.
पुण्याच्या आठ भागात प्रत्येकी शंभर पिंजरे लावले होते
या पिंजऱ्यांमध्ये उंदरांसाठी आमिष म्हणून गोडेतेलात बुडवलेल्या पावाचे तुकडे ठेवले जात...
पुणेकरांनी उंदीर स्वत:हून आणून दिले तर प्लेगचे जंतू सापडलेल्या प्रत्येक उंदरामागे आठ आण्याची बक्षिसीही मिळे.
पुण्यात घरोघरी गोरे सोजीर झडत्यांना जात.
लोकांच्या घरात कधीही घुसणं, स्त्रियांच्या शीलाचा विचार न करणं, एत्तदेशीयांच्या धार्मिक भावना न जपणं यातून उद्रेक वाढत गेला.
हाफकीन सायबाने लस बनवली, ती खुद्द लोकमान्यांनी टोचून घेतली, पण लोक बधेनात!!
- सुकृत करंदीकर
"स्वत:च्या घरा-गावातून हाकलून दिल्या गेलेल्या माणसांची अमेरिकन पत्रकार-लेखक जॉन स्टाईनबेकने शोधलेली कहाणी."
१९३० चं दशक.
महामंदीने जेरीला आलेल्या अमेरिकेत एक चतुर्थांश लोक बेकार झालेले.
हाताला काम नाही, जवळ फुटकी कवडी नाही. त्यात भर म्हणून धुळीच्या वादळांनी हैराण झालेल्या ओक्लाहामामधलं गरीब, हतबल ज्योड कुटुंब!
गाठीशी असलेलं सगळं मोडून-विकून, पैपैसा जमवून एक खटारा गाडी खरीदतात आणि त्यात सगळं सामान लादून,अक्षरश: जगायला गावाबाहेर पडतात..
‘कॅलिफोर्नियात पोचलो, तर तिथल्या फळबागांमध्ये काहीतरी काम मिळेलच!’
- इतक्या भाबड्या आशेचा एक धागा तेवढा असतो सोबतीला!
मग पुढे काय होतं?
त्यांना सापडतं का काम? पोटाला थोडं अन्न? जिवाला थोडं सुख?
त्यांची शेतं, त्यांची जनावरं, काळजीकाट्यानं जपलेल्या आणि गमावलेल्या किडूकमिडूक चीजवस्तू, आनंदाच्या आठवणी, आणि तसेच दुखरे-हळवे सल...
या सगळ्याचं.. शेवटी काय होतं?
मेघना भुस्कुटे
बर्गर असो की हॉटडॉग, साबुदाण्याची खिचडी असो की भेळ...
असे कितीतरी पदार्थ माणसाने अपरिहार्यतेतून रांधलेले आहेत. महायुध्दं, दुष्काळ, उपासमार आणि अभावातून जन्माला आलेल्या अन्नाची कहाणी.
मद्रास इलाख्यातल्या दुष्काळामुळे आपल्याला साबुदाण्याची खिचडी मिळाली!
ब्रिटिशांनी तांदूळ गायब केल्यावर बंगालमध्ये चुरमुऱ्यांची भेळ - झालमुरी बनवली जाऊ लागली.
मिष्टान्नं परवडेनात, तेव्हा चहात बिस्कीट बुडवायची आयडिया सुचली!
१९२८-२९ साली अमेरिकेतल्या भयंकर आर्थिक मंदीने ‘हॉट डॉग’ जन्माला घातला.
महायुध्दं लढताना दूरवरच्या सीमेवरल्या सैनिकांचं पोटपाणी चालवायला शिळं होणार नाही, गरम करावं लागणार नाही, ‘पटकन” खाता येईल असं फास्ट फूड, इन्स्टंट कॉफी शोधली गेली.
लोणची, जॅम, फळांचे रस, नाश्त्यासाठी धान्यांचे लाह्या-पोहे सारं काही तयार- कारखान्यात बनून ‘डबाबंद’ झालं!
एवढंच काय,
आज जिच्याविना आपली संध्याकाळ निभत नाही अशी चटपटीत चाट मुघलकाळच्या दिल्लीत कॉलराच्या साथीत बेजार लोकांवर उपचारासाठी सम्राट शाहजहानच्या शाही हकिमांनी पहिल्यांदा बनवली,
आता बोला!
प्रदीर्घ लॉकडाऊनमध्ये डोंगर उतारावरच्या निर्मनुष्य जगात भेटलेले ते दोघे ( की तिघे?)
आणि त्यांचा कुत्रा...ही कहाणी खरी की कल्पित?
हे खरंखुरं घडत होतं की फक्त घनगर्द जंगलातल्या मनात फुलत होतं?
गेरुच्या रंगाचा बंगला निर्मनुष्य होता. पण आवार स्वच्छ आणि नेटकं होतं.
बाग टवटवीत होती आणि एक खोपट होतं.
बुटकं, आटोपशीर, छाटून उभ्या रोवलेल्या पाच फांद्यांवर झाडपाल्याने शाकारलेलं.
दाराच्या चौकटीतून धगधगता उजेड बाहेर येत होता.
आत एक चूल होती. एक टांगलेला कंदील होता.
एक मोडकं टेबल आणि एक गंजकी खुर्ची होती.
टेबलावर जीर्ण पुस्तकांचा गठ्ठा होता.
एका भिंतीला बांबूचा स्टॅन्ड उभा होता.
त्यात कपडे, कांबळ्यापासून भांड्यांपर्यंत अख्खा संसार भरला होता.
- आणि माझ्या चाहुलीने उठून उभे राहिलेले ते दोघे होते.
बिंब आणि प्रतिबिंबही नाही; दोन्ही प्रतिबिंबच!
चुकून तडा गेलेल्या एका आरशातली.
तिसऱ्याच कोणाची तरी दोन प्रतिबिंबं!
रूप, रंग, अंगातले कपडे, कशातही तसूभरही फरक नाही.
दोघे एकाचवेळी एकसारखे हसले.
दोघांपैकी एक म्हणाला, मी स्पिनोझा आणि हा बारुख!
दारातून त्याचा कुत्रा ‘आऊ’ म्हणाला.
तेव्हा बारुख म्हणाला,
आणि हो, हा पांडू!
अनंत सामंत
फुलांच्या चित्रात, आणि बाजारांच्या, घरांच्या कौलांच्या फाटकांच्या चित्रात माणूस दिसत नाही.
रेल्वे क्रॉसिंगच्या, बस-टॅक्सीच्या भर रस्त्यात तेवढा माणूस वावरताना दिसला, पण तो भयभीत! बिचकलेल्या नजरेचा.
निळ्या गळ्याच्या गुबगुबीत पाखरांना दाणे घालताना तोंडावरचा मास्क न विसरणारा भयभीत माणूस.
त्या अनुपस्थित माणसांची चित्रं.
गाव मोठं झकास.
जुना, ग्रीकांपासूनचा इतिहास पोटात घेतलेलं, मोहमयी स्वप्नातलं गाव.
नाव : स्वाइनहॅम.
इथं जर्मनीत आधीच लोकसंख्या कमी.
त्यात रोगराई पसरलेली. रस्त्यावर, बाजारात कुलुपं.
माणसं नाहीत, त्यामुळे गर्दी नाही. उरलं काय ?
उरले,रस्ते ! ग्रेट ग्रेट बंगले.
देखणी झाडं. आणि काळीज चिरणारी खिन्न हवा.
भयानक शांतता. जर्मनीतल्या कडक लॉकडाऊनमध्ये एका गावात गवसलेल्या चित्रांच्या गोष्टी
- चंद्रमोहन कुलकर्णी
"ख्यातनाम कथाकार जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘पात्रां’च्या शोधातल्या एका वेड्या भटकंतीची थक्क करणारी कहाणी"
जमिनीच्या दोन मजले खाली मठाच्या तळघराच्या तोंडाशी मठाच्या महंतामागे मी कफनी घालून उभा होतो.
‘कुठंही रेंगाळायचं नाही. नाक वर ओढायचं नाही. तोंड तर अजिबात उघडायचं नाही.
तुम्ही माझी सावली बनून राहायचं. दार उघडताक्षणीच आपलं मौनव्रत सुरू होतं.
तुमची तयारी झाली असेल तर सांगा म्हणजे दरवाजा उघडतो...’
एवढं बोलून, महंतानं आपली मान जरा फिरवली.
त्या क्षणी जीए, माझा निश्चय जरा डळमळू लागला.
दूर अंतरावरची माझ्या मुलाची आर्त हाक मला ऐकू आली.
हा धिप्पाड अपरिचित दैत्य आपल्याला तळघरात कोंडणार तर नाही?
रात्रंदिवस जळत असलेले ते लाल दिवे.
स्नानगृहातली ती न संपणारी ती उष्ण पाण्याची धार...
चांदीच्या ताटातलं सुग्रास भोजन...
कफनीसकट पळून जाण्याची एक अनावर उर्मी क्षणात मनात आली.
त्याक्षणी इतकी वर्षं माझ्या डोक्यात ठाण मांडून बसलेले ते तीन स्वामी हसू लागले....
‘दरवाजा उघडताक्षणीच आपलं मौनव्रत सुरू होतं...’
- महंतानं नेट लावून तो दरवाजा त्यानं आपल्या अंगावर उघडला;
त्याक्षणी इतका वेळ कोंडून ठेवल्यासारखे दोन पक्षी वेगानं दरवाजातून बाहेर पडले आणि क्षणांत आकाशात उंच उडाले...
मी दुसऱ्या क्षणी अदृश्य शक्तीनं खेचल्यासारखा महंताच्या पाठोपाठ आत गेलो...
दिलीप कुलकर्णी
सतत खदखदत्या अस्वस्थ जंगलाच्या पोटात शिरून शोधलेली रहस्यं... आणि अनुत्तरित प्रश्न!
एकदा पोलिसाची खाकी वर्दी अंगावर चढली, की आयुष्यभर ताण, वणवण, त्रास आणि व्यवस्थेच्या लाथा!
कौतुक आणि स्तुती क्वचितच, शिव्याशाप रोजचे ठरलेले!
- मलई खायची संधी मोठी, पण ती मटकावणारे बोके मोजकेच;
पोलीस...
काही व्यवस्थेचे बळी ठरलेले... काही व्यवस्थेचाच बळी घेणारे.
काही वैफल्यग्रस्त, हताश, हतबल!...काही माज आलेले.
काही मजबूर... काही मस्तवाल.
कधीकाळी ज्याची गचांडी धरली तो गावगुंड ‘आमदार’ होऊन
ठाण्यात आला की त्याला सॅल्यूट ठोकताना स्वत:शीच चरफडणारे पोलीस!!
पेटलेल्या दंगलीतून कच्च्याबच्च्यांना वाचवणारे हळवे हात पोलिसांचेच,
‘आत घेतलेल्या गुंडाची सालटी सोलताना रक्त पिणारी नजरही त्यांचीच!
रवींद्र राऊळ
के पॉप, के ड्रामा, के फूड, के ब्यूटी अशा विविध मार्गांनी जगभरातल्या प्रत्येक देशाला अक्षरश: भंजाळून टाकणाऱ्या एका शक्तिशाली कोरियन लाटेचा शोध
जगाला सॅमसंग मोबाइल आणि ह्युंदाई गाड्या विकणारा दक्षिण कोरिया.
त्या देशाने सध्या जगभरातल्या तरुण मुलांना वेड लावणारे एक प्रकरण
जन्माला घालून पोसून - वाढवून सर्वत्र पसरवले आहे :
के पॉप!
या बँड्समधून दिसणारी दाढी- मिशा नसलेली गुळगुळीत कांतीची गोरीगोमटी मुलं आणि नाजूक लांबसडक पायांच्या, शेलाट्या मुली सध्या अख्ख्या जगातल्या तरुणाईचे ‘आयडॉल्स’ आहेत.
त्यांच्याविरोधात एक अक्षर बोलाल, तर घरातलीच ‘आर्मी’ तुमच्यावर तुटून पडेल.
या जगाची चमकधमक गुंग करून टाकणारी आहे, आणि आपल्या मुलांचे ‘आयडॉल्स’ झालेल्या कोवळ्या कोरियन कलावंतांचं खासगी आयुष्य अस्वस्थ करणारं!
वन्दना अत्रे
अब्जावधींची उलाढाल करणाऱ्या एका चावट- चोरट्या जगाची खिडकी उघडून आत शिरलं,
तर काय दिसतं?
अश्लील चित्रफितींचं हे उनाड, चावट जग. पॉर्न.
शिल्पा शेट्टीचा नवरा त्यातून कोट्यवधी डॉलर्स कमवत होता तो कोणत्या मार्गाने?
पॉर्न फिल्ममध्ये काम करणारी मुलं-मुली कोण? कुठून येतात?
‘जबरदस्ती होते म्हणूनच ते हे ‘अस्लं’काम करतात,
हा समज तरी खरा आहे का?
पॉर्नच्या शूटिंगवर बंदी आहे तर मग भारतात एवढ्या प्रचंड प्रमाणात
पॉर्नची निर्मिती कशी होते?
मढ आयलंडच्या बंगल्यांमध्ये काय चालतं?
ज्यांना पॉर्नमध्ये करियर करायचंय, ते स्त्री-पुरुष काय म्हणतात?
पॉर्नला ‘नैतिक’ विरोध असणारे खाजगीत क्लिपा सेव्ह करतात
आणि ‘असं काही (आपल्या जगात) नसतंच’ अशा समजुतीत असलेल्या पापभीरू पालकांची अर्ध्याकच्च्या वयातली मुलं पॉर्नसाठी डेटा जाळतात.
यातलं काय अनैतिक? आणि काय नैतिक?
मनोज गडनीस
सतत पॉर्न बघण्याची चटक लागलेल्या लोकांच्या शरीर-मनात आणि मेंदूत काय बदल होतात?
परस्परांच्या शरीरांबद्दलचा आदर, संमती आणि निरोगी लैंगिक संबंध न शिकवता,
केवळ शरीर चाळवणारी हिंसक लैंगिकता खुलेआम उपलब्ध असण्यातून जाणीव नसलेला आणि बेशुद्ध समाज तयार होतो.
मुक्ता चैतन्य
"राममंदिराच्या निर्माणाबरोबर बदलाची कात टाकण्याच्या प्रक्रियेत असलेल्या अयोध्येतले दहा दिवस"
अयोध्येत ना फार मोठे अपेक्षाभंग भेटतात. ना मोठी उमेद.
जे जसं आहे त्याचा स्वीकार.
शहर कसलं? इतिहासात मागेच राहून गेलेलं कळकट, अंधारं आणि अस्वच्छ नगरच आहे ही अयोध्या म्हणजे.
धड रस्ते नाहीत. सगळीकडे कचऱ्याचे ढीग. तो उकरुन अन्न शोधणारी माकडं.
गावभर फिरणाऱ्या , रस्त्यात विधी करणाऱ्या गाई. उघड्या वाहत्या गटारी.
सतत दुर्गंधी. जेममेम दिवे... अशी अवस्था गावाची!
हातात पैसा नाही, वाड्यातला अंधार सरत नाही, उत्पन्नाचं दुसरं साधन नाही;
पण श्रध्दा एकच, ठाकूरजी अपनी व्यवस्था खुद करते है!
पाहावी तिकडे हलाखीच अयोध्येत. पण माणसांत वखवख नाही, हाव नाही.
गरिबीतही शांत, आपल्यापुरतं, जमेल तसं, हसरं आयुष्य जगतात माणसं.
या शहराला खळाळ नाही, जसा इथल्या शरयूला नाही.
संथ. गंभीर. शांत. वाहणं फक्त आहे.
तोच अलिप्त भाव माणसांमध्येही दिसतो.
भांडूनतंटून, हक्कानं काही मागावं असं काही इथल्या माणसांच्या बोलण्यात येत नाही.
पांडेकाका सांगत होते, ‘बनबास तो रामजीका भी था, वो कटने में समय लगता है, कष्ट तो है..
अब रामजी को देखो.. उनका अपना घर अयोध्या में कितने बरस नहीं था, अब जा कर घर बनेगा..
उन्होने प्रतीक्षा की, हनुमानजीने की,
तो हम कौन है?’
मेघना ढोके / प्रशांत खरोटे
"कोरोनाच्या अस्वस्थ काळाने डहुळलेल्या मनाची सालं सोलून काढतानाचं अत्यंत अस्वस्थ चिंतन."
पांडुरंग सांगवीकर एकेकाळच्या अस्वस्थ तारुण्याचा प्रतिनिधी होता.
हल्ली भेटतात का हल्लीचे पांडुरंग? ते कसे दिसतात?
साहित्य असो की कला, अगदी खेळाच्या मैदानावरही या नव्या काळात अत्त्युच्च प्रतिभा असणारे/ गाठणारे लिजंड्स दिसत नाहीत.
असं का व्हावं? हा काळच कमी उंचीच्या माणसांचा आहे का?
डोक्यावर बसत चाललेलं तंत्रज्ञान कानफटात मारून म्हणेल,
तुमचा काही उपयोग नाही; तेव्हा आता मरा..
- तर मग आपण माणसांनी काय करायचं?
बोस्टनमधल्या हार्वर्डच्या कॅम्पसमधून दिलेल्या खास मुलाखतीत उलगडलेली अनेक रहस्यं
मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. मराठी माध्यमातलं शिक्षण.
आणि सध्या? - जगातील सर्वश्रेष्ठ अशा हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन!
ते म्हणतात, कोरोनाने शिकण्या-शिकवण्याच्या पध्दती बदलल्याच,
आता बिझिनेस कसा करावा याची तंत्रं आणि मंत्रही बदलले आहेत.
उत्तम ‘बिझिनेस’ चालवायचा असेल तर आत्ताच्या बदलत्या जगात फक्त ‘नोइंग’ आणि ‘डुइंग’ एवढंच पुरेसं नाही,
‘बीइंग’ - म्हणजे तुम्ही काय प्रतीची व्यक्ती आहात, हेही महत्त्वाचं ठरणार आहे.
देवेंद्र दर्डा / अपर्णा वेलणकर