गडचिरोलीमधलं आणि छत्तीसगडमधलं जंगल चिरत आत गेलं की तिथला काळोखा सन्नाटा अंगावर येतो. वर्षानुर्वष रक्त-मांसाचा वास आणि नक्षली बंदुकांच्या धुरात गुदमरलेल्या या भागात अखंड पायपीट करताना जे भेटलं-दिसलं ते अजबच!!
नक्षलवादाच्या विरोधात उभे राहिलेले फाटके आदिवासी, शिकून जगायला निघालेली त्यांची तरुण पोरं, बंदुकांसाठीच्या पैशातून पुस्तकं विकत घेऊन शाळांना वाटणारे सरकारी अधिकारी आणि आपल्या पुढच्या पिढीला ‘आयआयटी’च्या ‘एन्ट्रन्स’ला बसवण्यासाठी धडपडणारे खूंखार नक्षलवादी. महाराष्ट्रातल्या भामरागड, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा आणि छत्तीसगड इथल्या दंतेवाडा, सुकमा, बिजापूर या नक्षलग्रस्त भागातल्या भटकंतीतून हाती आलेले काही आश्वासक तुकडे!