तामीळनाडूतल्या पापनायकन पुदूर गावातला एक साधा वेल्डर माणूस. लग्न झालं.
संसार सुरू झाल्यावर एके दिवशी बायकोशी नोकझोक झाली. मासिक पाळीच्या दिवसांत ती नीट काळजी घेत नाही, हे कारण.
बायको म्हणाली, ‘वाट्टेल ते उपाय सुचवू नका. दर महिन्याला मी त्या महागड्या नॅपकिन्सची चैन केली ना,
तर आपल्याला घरी पुरेसं दूध आणता येणार नाही.’
मठ्ठ वास्तवाचा दगड ढकलून कोणत्याही बदलाला पहिली चाल देणारा प्रश्न
त्याच्या ‘अर्धशिक्षित’ डोक्यात वळवळायला लागला : असं का?
– आणि त्यातून उभं राहिलं झपाटलेपणाचं एक वादळ.
शांतीला आणि तिच्यासारख्या अनेक बायांना परवडणारे स्वस्त आणि स्वच्छ नॅपकिन्स बनवायचा ध्यास
या अबोल, संकोची वेल्डर माणसाला गावातून उचलून
थेट जगाच्या नकाशावर घेऊन गेला.