बाबा अलाउद्दिन खान हे तिचे वडील.
ते म्हणाले, ‘तुझ्यावर माँ शारदेचा आशीर्वाद आहे. हे सूरबहार हाती घे.’
– आणि तिने एका व्रताचा निखाराच जणू हाती घेतला.
पुढे जन्मगाठ पडली ती एका अवलिया कलावंताशी. पंडित रविशंकर.
संसार सुरू झाला, पण फुलला नाही!
दोघांमध्ये कुणाची कला श्रेष्ठ, असा पेच उभा राहिल्यावर तिने कठोर पण केला,
गुरुजी आणि माँ शारदा, या दोघांव्यतिरिक्त कुणासाठीही कधीही न वाजवण्याचा!
…आणि स्वत:ला दाराआड बंद केलं.
दक्षिण मुंबईतल्या एका इमारतीत त्या आजही बंद दाराआड राहातात.
मध्यरात्र उलटताना सूरबहारच्या स्वरांनी दरवळणाऱ्या बंद दाराच्या आड!
मोजके शिष्य वगळले, तर ते स्वर्गीय वादन गेल्या पन्नासएक वर्षांत
कुणीही- अक्षरश: कुणीही ऐकलेलं नाही!!!..